Friday 6 April 2012

ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे.....  तुटेल धरणे प्रपंचाचे ........

प्रपंच हातावेगळा करीन आणि मग मी भगवंताकडे वळेन... असे म्हणणारा मनुष्य शेवटी फसल्याशिवाय राहत नाही.......  प्रपंचासाठी रात्रंदिन राबणारा माणूस परमार्थाकडे वळत नाही हे पाहून श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात.....

ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे ॥
प्रपंचाचे धरणे तुटण्यासाठी हरिनामजप करणे ह्यासारखा दुसरा सोपा उपाय नाही...... " सायासे करिसी प्रपंच दिननिशी " मधला प्रपंच..... हा सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला बायकामुलांचा, घर-गृहस्थी आणि व्यवसायाच्या अपेक्षेत असलेला प्रपंच.......  तर  " तुटेल धरणे प्रपंचाचे "  मधील प्रपंच हा शब्द "देह " ह्या अर्थाने आहे........ 

सद्गुरू श्री.वामनराव पै लिहितात.......  पाचांचा प्रकर्ष म्हणजे प्रपंच होय..... पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश या पंच महाभूतांचा प्रकर्ष देहाच्या ठिकाणी झालेला आहे.......  एरव्ही ही पंचमहाभुते एकमेकांना गिळू पाहतात...... पण या देहाच्या ठिकाणी मात्र ती गुण्यागोविंदाने नांदतात......

वास्तविक ' मी ' देहापासून वेगळा आहे...... पण ' मी देह आहे ' हा भाव जीवाचे ठायी स्फुरू लागला..... या भावबंधनालाच " प्रपंचाचे धरणे " असा शब्दप्रयोग ज्ञानदेव करतात...... जोपर्यंत हा देहभाव आहे आहे तोपर्यंत जीवाने वाटेल.....  तेवढी यातायात केली तरी ज्या सुखासाठी.....  त्याची धडपड चालू आहे ते सुख त्याला मिळणे शक्य नाही...... . या देहभावाची ( देहाची नव्हे ) तुटी होणे, भावबंधनाची गाठ सुटणे म्हणजेच " तुटेल धरणे प्रपंचाचे ".........

हे प्रपंचाचे धरणे सुटण्यासाठी साधकाला अंतर्मुख होता आले पाहिजे......  नामस्मरणाने साधकाचे मन अंतर्मुख होते......  हळू हळू नामात दंग झालो की मनातील विचारांची गती आणि प्रमाण कमी होत जाते....... जेथे उठे ' मी ' चे स्फुरण तेथे म्हणा विठ्ठल विठ्ठल".....  अशा नामस्मरणात देहभाव विरून जातो..... 

'मी' ची देहाशी पडलेली गाठ सुटते......  देहभाव जाऊन त्याच्या ठिकाणी देवभाव जागृत होतो..... म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात.......

हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥

ॐ श्री गुरुदेव दत्त......

No comments:

Post a Comment