Sunday 22 April 2012

वसुंधरा दिन.... वनरक्षण, वनसंवर्धन व वनवर्धन... वसुधेचे ऋण फेडू चला... निसर्ग वाढवू चला....

आज आपल्‍या समोर नि‍रनिराळया समस्‍या उभ्‍या आहेत.... जसे नाहक होत असलेली वृक्षतोड, वाढती लोकसंख्‍या, कारखान्‍यांनी व वाहनांनी सोडलेला काळा धूर, दूषित सांडपाणी, घनकचरा, वाढत चाललेले वाळवंट.... याच बरोबर प्रदूषणामुळे जागतिक स्‍तरावर होत असलेले विशेष महत्‍वाचे परिणाम म्‍हणजे... वातावरणात होत असलेला बदल व ओझोनचा विरळ होत असलेला थर.... कदाचित आपल्‍या काही प्रयत्‍नांनी आपण या काही समस्‍या सोडवू शकतो.... परंतु नामशेष होत चाललेल्‍या वनस्‍पती आणि प्राणी यांचा -हास आपण भरुन काढू शकत नाही..... त्‍यामुळे या प्रश्‍नांवर आपण गंभीर पणे विचार करायलाच हवा.....

वैश्विक उष्मा, प्रदूषण, अन्न समस्या, ताणतणाव, पर्यावरणाचा ऱ्हास, संसाधनांची कमतरता, जलसंकट हे प्रगत मानवाला भेडसावणारे काही गंभीर प्रश्न..... यातील बहुतेक प्रश्नांचे उत्तर ‘वनांत’ आहे.... पृथ्वीवरील सजीवांच्या संदर्भात नैसर्गिक वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.....

जंगले क्षितिजापर्यंत धूसर होत आहेत..... वनविनाशामुळे माणसासोबतच वन्यजीवांचेही अस्तित्व धोक्यात आहे...... विशेष म्हणजे पृथ्वीवरील एकूण जीवसृष्टीच्या अर्धी जीवसृष्टी ही वनाच्या आश्रयाने राहते..... पण त्यांचा जगण्याचा निसर्गदत्त अधिकार हिरावून घेतला जात आहे.... वृक्षारोपण म्हणजे जंगले नव्हेत..... पृथ्वीवरील सजीवांच्या संदर्भात नैसर्गिक वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे..... वनांच्या र्‍हासामुळे दरवर्षी सुमारे १२00 कोटी टनापेक्षाही अधिक बहुमोल माती वाहून जाते.... या मातीपासून सुमारे पाच कोटी टन धान्य सहज पिकविता येऊ शकते..... साधारण सहा से.मी. मातीचा थर तयार होण्यासाठी दोन ते अडीच हजार वर्षे लागतात.....

मानवाच्या कोणत्याही गरजेची पूर्तता करण्यासाठी पहिला घाव पडतो तो वनांवरच..... वन साफ करूनच आपण नवीन जमीन मिळवतो..... मग ती जमीन शेतीसाठी असो,घरबांधणीसाठी असो, नागरी सुविधांच्या नावाखाली रस्ते, रेल्वेमार्ग, उद्योग बांधण्यासाठी असो, प्रचंड धरणे,वीजप्रकल्प, चराऊ कुरणे किंवा जनावरांसाठी खाद्यान्न लागवडीसाठी असो, पहिला घाव बसतो झाडांवरच.... अगदी परखड शब्दांत सांगायचे तर वृक्ष-वनांना मानवाचा काहीएक उपयोग नाही..... नाहीतर ती माणसाच्या आगमनापूर्वी जगली- फोफावली नसती..... वनांचे स्वाभाविक शत्रू म्हणजे नैसर्गिक आपत्ती,भयंकर पूर, वादळे , वणवे आणि रोग.... आज मात्र माणूसच त्यांचा सर्वात मोठा शत्रू ठरला आहे.....

प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि तिच्या गरजा (जीवनावश्यक आणि त्याहून जास्त उपभोग्यलोलूप) वनांच्या नाशाचे मूळ कारण आहे.... त्यातही आपण वृक्ष समूळ नष्ट करतो.... म्हणजे आपल्याच हाताने सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारून टाकतो.... आज तिजोरी भरेल, पण उद्याचे काय..? वनांचे शाश्वत व्यवस्थापन व वनवर्धन हाच यावरचा उपाय आहे..... मूळ मुद्दलाला धक्का न लावता व्याजात गरजा भागवायच्या.... आणि त्याचबरोबर मुद्दल कसे वाढेल हे पाहणे म्हणजे वनांचे शाश्वत व्यवस्थापन होय..... हीच काळाची गरज आहे..... शाश्वत व्यवस्थापनाचा मंत्र आपल्याला विदुरनीतीत मिळतो..... ‘पुष्पं, पुष्पं विचिन्वीत, मूळच्छेदं न कारयेत।’ अर्थात फूल अन् फूल वेचा मात्र झाडाला धक्काही लावू नका..... हा निसर्गरक्षणाचा प्राचीन संदेश तर आपल्याच मातीतला आहे.....

गेल्या शतकात मानवाच्या राहणीमानात न भूतो न भविष्यती बदल घडून आला आहे.... निसर्ग हा न संपणाऱ्या स्रोतांचा खजिना आहे.... या विचाराने माणसाने त्याचा बेलगाम वापर सुरू केला.... हा वापर इतका जास्त झाला की, आता हिरवी आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली आहे.... निसर्गाचा मुक्त वापर करत माणसाने आपले राहणीमानच बदलून टाकले आहे..... भरपूर वापरा, वापरा आणि फेका संस्कृती उदयाला आली..... नेटका वापर, काटकसर, पुनर्वापर हे शब्द जणू व्यवहारातून बादच झाले..... वापरा व फेका - यूज अँड थ्रो.... प्लास्टिकच्या वस्तू उदंड झाल्या.....

वनरक्षण, वनसंवर्धन व वनवर्धन यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे..... सजीव सृष्टी जगायची असेल तर पर्यावरणही नीटपणाने राखले पाहिजे..... वनांबाबत उदासीन राहणे आपल्या विनाशावर शिक्कामोर्तब करण्यासारखेच आहे....वनांचे रक्षण आणि वर्धन करायला हवे.... अन्यथा पृथ्वीचा विनाश अटळ आहे..... निसर्गाचे रक्षक बना.... भक्षक नाही... धरित्री वाचली... तर जग वाचेल.....

आपल्यापैकी कितीतरी जण आयुष्यात एकही झाड लावत- जोपासत नाही..... निदान वाचविण्यासाठी तरी हातभार लावू शकतो..... वृक्षजोपासनेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा..... आपल्याला झेपेल अशा पर्यावरण निगडित संस्थेशी संलग्न व्हा..... खारीचा वाटा उचला...... आजच्या वसुंधरा दिनी 'हिरवाई निर्माण' करण्याचा संकल्प सोडून सर्वजण त्यादृष्टीने कार्यरत झाले.... आणि रोजचाच दिवस हिरवा होऊ लागला तर आजच्या दिनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल.....

मातीन अंग चोरलं आहे.... आकाशान मिटले डोळे .... अरे मानवा जागा हो तू .... धरणीला जड झाले ओझे......

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

No comments:

Post a Comment